इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची जोरदार चर्चा सुरू आहे. अंजू फेसबुक मित्र नसरुल्लाहला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली आणि तिथेच तिने इस्लाम धर्म स्वीकारून त्याच्याशी लग्न केले. सुरुवातीला अंजूला एक महिन्याचा व्हिसा मिळाला होता, पण आता पाकिस्तानने तिला एक वर्षाचा व्हिसा दिला आहे. व्हिसाची मुदतवाढ मिळाल्यामुळे अंजू भारतात परतण्याची शक्यता फार कमी आहे.
पाकिस्तानात गेल्यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि इस्लाम धर्म स्वीकारून फातिमा बनली. तिच्या व्हिसाची मुदत संपणार होती, मात्र पाकिस्तानने तिला मुदतवाढ दिल्यामुळे आता ती नसरुल्लाची पत्नी म्हणून पाकिस्तानातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने नसरुल्लाहच्या विनंतीवरून तिच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. खुद्द नसरुल्लाहने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, अंजूचा पहिला पती अरविंद याने नसरुल्लाहविरुद्ध जयपूरच्या फुलबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे सीमेपलीकडील व्यक्तीशी ती लग्न करू शकत नाही, असा दावा अरविंदने केला आहे. केवळ मजा मारण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली आहे. आता मुलांना तिचे तोंड पाहण्याचीही इच्छा नाही, असेही अरविंदने म्हटले आहे.