“केजरीवाल सत्तेत आल्यानंतर पैशाला अधिक महत्त्व देऊ लागले”- अण्णा हजारे

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, समाजसेवेच्या मार्गावर चालण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीला आता भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढले जाणे दुर्दैवी आहे. अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल हे त्यांच्याशी स्वयंसेवक म्हणून जोडले गेले होते आणि त्यांनी नेहमीच त्यांना प्रामाणिकपणा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला होता.

अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचारविरोधी चळवळीदरम्यान जेंव्हा  अरविंद केजरीवाल त्यांच्यासोबत होते तेव्हा त्यांनी त्यांना वारंवार समजावून सांगितले होते की, स्वतःचे विचार आणि आचरण स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे. मी त्यांना  नेहमीच सांगायचो की जीवन निष्कलंक असले पाहिजे आणि त्याग करायला शिकले पाहिजे.

अण्णा हजारे यांनी असेही म्हटले आहे की अरविंद केजरीवाल सत्तेत आल्यानंतर पैशाला अधिक महत्त्व देऊ लागले आणि त्यांचे प्राधान्यक्रम बदलले. त्यांनी पुढे चिंता व्यक्त करत म्हटले की, ‘आता काय करता येईल? जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या मूलभूत तत्त्वांपासून दूर जाते तेव्हा त्याचा मार्ग वेगळा होतो.’

अण्णा हजारे यांनी सूचित केले की केजरीवाल यांनी सत्तेच्या लोभामुळे ज्या मूल्यांसाठी त्यांनी  संघर्ष केला होता त्या मूल्यांचा त्याग केला. अण्णा हजारे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यापूर्वी भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये विरोधकांच्या निशाण्यावर होते, परंतु आता त्यांचे जुने सहकारी आणि मार्गदर्शक अण्णा हजारे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. अशा परिस्थितीत, हे विधान येत्या काळात आम आदमी पक्षासाठी नवीन समस्या निर्माण करू शकते.