जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने अनेकांचे प्रवेश होत असून, गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील माजी मंत्र्यांसह काही माजी आमदारांचेही प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटात झाले. आता प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील शरद पवार गटातील काही बडे नेते येणार असल्याची माहिती अजित पवार गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा मेळाव्यादरम्यान हा प्रवेश होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात शिल्लक असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटातील काही बडे नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबतच जळगाव जिल्ह्यातील काही नेत्यांचाही समावेश राहणार आहे. याबाबत अधिकृत नावे समोर आली नसली, तरी १४ मे रोजी राज्यातील शरद पवार गटातील काही बड्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीनंतरच अधिकृत नावे देखील समोर येणार आहेत. त्याबाबत उत्सुकता आहे.
दोन्ही गट एकत्रीकरणाचे प्रयत्न वेगात सुरू
शरद पवार गट व अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी आमदारांनीही अजित पवार गटात प्रवेश केला. आता दुसऱ्या टप्प्यात काही नेत्यांचा समावेश राहणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच इतर नेतेही प्रवेश करतील अशी शक्यता आहे.