धडगावात आणखी एक मृतदेह पुरला मिठात; घातपाताचा आरोप

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२२ । धडगाव तालुक्यातील कालिबेल येथील ऊसतोड शेतमजुराने मनमाड येथे आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे तसेच या घटनेला दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून मृतदेह मिठात पुरून ठेवला आहे. दरम्यान, धडगाव येथील दोन महिन्यातली अशी ही दुसरी घटना आहे.

ईश्वर सिपा वळवी (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये तोंडले गावात ऊसतोड कामासाठी धडगाव तालुक्यातील कालिबेल येथून २८ नोव्हेंबरला मनोज चव्हाण, रवी चव्हाण तसेच मुकादम आट्या वन्या वळवी हे मृत ईश्वर सिपा वळवी व गावातील काही मजुरांना घेऊन गेले होते.

जीवाला धोका असल्याचे वडिलाना सांगितले
दरम्यान, जास्तीचे काम देऊन ऊसतोड न केल्यामुळे तोंडले येथेच ईश्वर वळवी व इतर मजुरांना मारहाण केली, असा आरोप केला आहे. शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ईश्वर वळवी हा घरी येत असताना मनमाड येथे दि.४ नोव्हेंबरला त्यांना रवी चव्हाण, मनोज चव्हाण व आट्या वन्या वळवी यांनी बसमधून जबरदस्तीने उतरवून घेतले. त्यानंतर त्यांच्यापासून माझ्या जीवास धोका आहे, मला लवकर घ्यायला यावे. अशा प्रकारचे फोन ईश्वर वळवी यांनी त्यांच्या वडिलांना केला होता. त्यानंतर ईश्वर यांनी आत्महत्या केल्याचे समजले.

त्या महिलेचाही मृतदेह मिठात दफन
दोन महिन्यांपूर्वी धडगाव तालुक्यातील खडक्या येथील आदिवासी महिलेवर अत्याचार प्रकरणात न्याय न मिळाल्यामुळे कुटुंबाने संबंधित महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो मिठात पुरून ठेवला. मात्र, या प्रकरणाचा अद्यापही छडा लागलेला नाही. आता घातपाताची अशीच एक घटना समोर आली आहे.