कोरोनानंतर पुन्हा संकट? चीनमध्ये ‘या’ व्हायरसचा उद्रेक

#image_title

बीजिंग : २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) वेगाने पसरत आहे, ज्यामुळे रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होत आहे आणि स्मशानभूमीतही जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या व्हायरसने चीनमध्ये कोरोनासारखा कहर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार, या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत. एचएमपीव्ही, इन्फ्लूएंझा ए. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोरोनासारखे अनेक विषाणू एकाच वेळी थैमान घालत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहेत की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत का नाही.

एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय?

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए व्हायरस आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील तो वेगाने पसरू शकतो. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यात हे सर्वांत सामान्य आहे. याचे मुख्य लक्ष्य मुले आणि वृद्ध आहेत. याच लोकांना कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक फटका बसला होता. व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना मुखाच्छादन घालण्याचा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा आणि वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे.

भारतात अलर्ट जरी

कोरोनाचा धोका आता आटोक्यात आला असे वाटत असतानाच चीनमध्ये आलेल्या नव्या विषाणूने आशियाई देशांची झोप उडवली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या आपत्तीवर लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात भारतातही अलर्ट जारी झाला आहे. हिवाळ्यात या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता याचा फैलाव होण्याची भीती नाकारता येत नाही.