जळगाव : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 13 मे रोजी जळगाव आणि रावेर मतदार संघात मतदान प्रक्रिया होत आहे. सुविधा मिळत नाहीत, विकास झालेला नाही म्हणून बऱ्याचशा नागरिकांकडून मतदानावर बहिष्कार टाकला जातो. संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपले मत देण्याचा अधिकार दिल असून मतदानावर बहिष्कार न टाकता प्रत्येकाने निर्भयपणे सोमवार 13 मे रोजी मतदानाचा हक्क बजवा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
आपल्या परिसराचा विभागाचा तालुक्याचा वा मतदार संघाचा विकास झालेला नाही, म्हणून बऱ्याच ठिकाणाहून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जाते, किंवा दोन ते पाच-पंचवीस मतदार नागरिकांच्या सह्या असलेले पत्रक प्रशासनाकडे दिले जाते.
निवडणूक मतदानावेळी मतदान न केल्यास निवडून येणारा लोकप्रतिनिधी तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे किंवा मतदान नाकारल्यामुळे तुमच्या विभागाकडे, गावाच्या विकासाकडे, सोयी सुविधा, अडीअडचणी सोडविण्यासाठी लक्ष देणार नाही. दुर्लक्ष करतील. लोकसभा किंवा विधानसभा किंवा कोणतीही निवडणूक असो, मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान जनजागृती तसेच केंद्रावर पूर्ण तयारी केली जाते. अशा वेळी मतदान करू नये, मतदानात भाग घेवू नये, बहिष्कार टाकण्यासाठी दबाव आणला जातो, प्रतिबंध केला जातो अशा वेळी नियुक्त पोलीस पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई होउ शकते.
मत नाकारण्यासाठी नोटाचा पर्याय
संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. एकही उमेदवार मत देण्यास पात्र नाही वा नकार असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाकडून नोटा चा पर्याय दिला आहे. त्यामुळे मतदान नाकारत बहिष्कार न टाकता नोटा या पर्यायाव्दारे मत नोंदवून मतदानाचा हक्क अवश्य बजवा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.