महत्वाची बातमी! लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार छाननी, ‘या’ महिलांचे अर्ज होणार बाद, काय आहेत निकष ?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिला लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लवकरच हा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन आगामी अर्थसंकल्पात त्यासंबंधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणूक काळात अर्ज दाखल केलेल्या 13 लाख महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच लाभार्थींना डिसेंबरचा हप्ता देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल.

या महिलांचे अर्ज होतील बाद
डिसेंबर महिन्याचे पैसे येण्याआधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. मात्र सरकारला सर्व अर्जांची छाननी करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या अर्जांसंदर्भात तक्रार आलेली आहे, त्याच अर्जांची छाननी केली जाईल, असे सांगितले जात आहे. दहा लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. खऱ्या गरजवंतांनाच रक्कम मिळावी, या उद्देशाने पुढील तीन महिन्यांत अर्जांची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची नावे योजनेतून वजा केली जातील, अशी माहिती मिळत आहे.

योजनेत बदल
दरम्यान, या योजनेत वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले. लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्षे करण्यात आले. तसेच अगोदर कुटुंबातील एका महिलेसाठी ही योजना लागू असेल असा नियम होता. मात्र तो बदलून कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वय असणाऱ्या सर्व महिलांसाठी ही योजना लागू असेल, असा बदल करण्यात आला. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? किती महिलांचे अर्ज बाद होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.