जिल्ह्यात विविध विभागात 414 जणांना नव नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना नियुक्तीपत्र प्रदान

जळगाव :  आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. आयुष्यात संघर्ष हा महत्त्वाचा आहे आणि संघर्षातूनच आपण बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो.  यामुळे या पुढल्या काळात शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवाकरून विश्वात संपादित करा, जनतेची मने जिंका गोरगरीब जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात 19 हजार कर्मचाऱ्यांची पद भरती राज्य शासनाने हाती घेतले असून या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणे ही सोपी बाब नाही. मात्र असे असताना देखील अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन उमेदवारांना आज नियुक्तीपत्र दिले जात आहेत ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरातून महाराष्ट्र शासन भरतीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवत आहे. नवीन नियुक्त अधिकारी व कर्मचारी आजपासून जबाबदार अधिकारी व कर्मचारी झाले आहेत याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आपण सगळे आपल्या गुणात्मक कौशल्याच्या जोरावर शासकीय नोकरीत आला हीच या शासनाची पारदर्शकता आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कामातून आपली प्रतिमा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात आपण ती कराल असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

महाबळ परिसरातील संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी शासनातर्फे राबविण्यात आलेल्या महाभरती 2023 2024 अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप व जळगाव पर्यटन चित्रफितीच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ना. पाटील बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील, आ.सुरेश भोळे, आ. लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.डी लोखंडे, प्रशिक्षणातील सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो,यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी महसूल व जिल्हा परिषद प्रशासनातील महाभरती 2023-2024 अंतर्गत अंतिम निवड झालेल्या एकूण 414 कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त 75 हजारांपेक्षा अधिक तरुणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून त्या दृष्टीने शासन सर्व पातळीवर उपाययोजना करीत आहे. अलीकडच्या काळात शासकीय नोकरी मिळणे ही सोपी बाब राहिलेली नसून अत्यंत अवघड अशी बाब झाली आहे. आपल्या मेहनतीमुळे आपल्याला शासकीय नोकरी मिळत आहे ते महत्त्वाचे आहे. असे सांगत ग्रामविकास मंत्री यांनी सर्व नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

यांची झाली नियुक्ती 

नवनियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यात तलाठी 195, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 35, स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक 32, औषध निर्माण अधिकारी 10, कनिष्ठ सहाय्यक 35, व शिक्षण सेवक 114 यांचा समावेश आहे.

आपण एकदा संघर्ष करून परीक्षा दिली की उत्तीर्ण होतात व शासकीय नोकरीत समाविष्ट होतात. मात्र आम्हा राजकारण्यांचे आयुष्यात दर पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे आम्हालाही आयुष्यात संघर्ष करावा लागतो. भावी आयुष्यात प्रगती करायची असेल तर आत्ताच मेहनत घ्यावी लागेल तेव्हाच आम्हाला आपल्यात बसलेल्यातून एखादा वरिष्ठ अधिकारी झाल्याचे बघायला मिळेल, अशी खात्री देखील ना .पाटील यांनी व्यक्त केली.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी  सांगितले की, राज्याच्या पर्यटन धोरणात अमुलाग्र असा बदल राज्य सरकारने अलीकडच्या काळात केला असून राज्यात पर्यटन वाढीसोबतच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, व महसूल प्रशासनाच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांचे यावेळी जाहीर अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यातील 21 पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या चित्रफितीचें लोकार्पण करण्यात येत आहे ही बाब अत्यंत भूषणावह असून पर्यटनावर आधारित चित्र फित तयार करणारा जळगाव जिल्हा हा पहिलाच जिल्हा असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री  अंकित यांनी मानले. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी सोपान कासार हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत असल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.