भुसावळ : भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भुसावळ मंडळातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात ५ एप्रिल रोजी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय तसेच सर्व वरिष्ठ विभागीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यात पाचोरा-जामनेर-बोदवड रेल्वे मार्गावरील पहूर स्थानकावर मालधक्का उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
बैठकीदरम्यान डीआरएम इति पाण्डेय यांनी संपूर्ण मंडळात चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा विकासकामांची माहिती राज्यमंत्री खडसे यांना दिली. प्रवासी सुविधांचा विकास, अधोसंरचनेत सुधारणा व स्टेशन विकास यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. गाडी क्र. ०१२११/०१२१२ (बडनेरा नाशिक मेमू) ला बोदवड व वरुडगाव स्थानकांवर थांबा, तसेच गाडी क्र. २२२२१/२२२२२ (मुंबई निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस) ला भुसावळ स्थानकावर थांब्याची मंजुरी देण्यात आली.
गाडी क्र. १२११२ (अमरावती एक्सप्रेस) मध्ये आरक्षणासाठी बर्थ वाढविण्यात आला आहे. दुसखेड़ा येथील क्र. १५७ जवळील झाडंझुडपं हटविणे व अॅप्रोच रस्त्याचे डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे. भादली व बोदवड येथील प्रकाशयोजनेचे काम कार्यरत आहे. सावदा रेल्वे उड्डाणपूल येथे विद्युत उपकरणांची वारंवार चोरी झाल्याने पुन्हा दिवे बसविण्यात आले आहेत.
पाचोरा-जामनेर-बोदवड रेल्वे मार्गावरील पहूर स्थानकावर मालधक्का उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जालना-जळगाव रेल्वेमार्ग हा पाचोरा-जामनेर मार्गाला ३०.५ मीटर रेल ओव्हर रेलच्या माध्यमातून ओलांडेल. हा नवीन पहूर स्थानकापासून सुमारे १.२ किमी अंतरावर असेल. बैठकीस अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनीलकुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) एम. के. मीणा आणि सर्व वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते.
सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
भुसावळ कॉर्ड लाइनवर नवीन प्रवासी प्लॅटफॉर्म उभारणीसाठी केलेल्या संयुक्त स्थल सर्वेक्षणात तांत्रिकदृष्ट्या कॉर्ड लाइन क्र. २ वर प्लॅटफॉर्म उभारणे शक्य असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. मंत्री खडसे यांनी सर्व प्रगतीशील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रवाशांच्या सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्याचे आवाहन केले.