अत्याधुनिक सी.टी.स्कॅन मशीन खरेदीस मान्यता : डीपीडीसीमधून पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून निधी मंजूर

जळगाव :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता पर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मागच्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून (DPDC मधून) मंजूर करण्यात आला. आता जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार 15 कोटी निधीच्या अत्याधुनिक 128 स्लाईसची सी.टी स्कॅन मशीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी दिलेल्या तांत्रिक मान्यता नुसार नुकतीच प्रशाकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता सर्व यंत्रानी सज्ज झाले आहे. दुर्धर आजारावरही आता निदान होईल, त्यातून शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांच्या आरोग्याला संजीवनी मिळेल याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील जुने सीटी स्कॅन मशीन 16 स्लाईसचे असल्यामुळे रुग्णांच्या निदानात अडचण येत होती. 128 स्लाईसचे मशीन शरीराच्या तपशीलवार आणि अचूक प्रतिमा तयार करत असल्याने रुग्णांमधील रोगांचे निदान करण्यासाठी या मशीनचा रुग्णांच्या अचूक निदानासाठी फायदा होणार आहे, अपघातग्रस्त रुग्ण, लहान मुले व इतर रुग्णांचे जलद स्कॅनिंग करणेही या मशिनमुळे सोईचे होणार आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर केला होता.

हृदयरोग, रक्त वाहिनींचे अडथळे, याचे निदान करता येण्यासाठी जिल्ह्यातील हृदय रोगाशी निगडीत रुग्णांना जलद व आत्याधुनिक उपचार 128 स्लाईसची सी.टी स्कॅन मशीन ची आवश्यकता होती. त्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार, आमदार यांच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याच्या तत्पर अंमलबजावणीमुळे 15 कोटी रुपयाचे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.