जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रांना मान्यता, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पाठपुरावा

जळगाव : जिल्ह्यात पणन आणि सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून पणन अंतर्गत कापूस खरेदी कमी झाल्याने केंद्र बंद अवस्थेतच आहेत. त्यामुळे यावर्षी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) अंतर्गत जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, लवकरच सुरू होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे

जिल्ह्यात रावेर, यावलचा काही भाग वगळता बहुतांश तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. कोराना काळात तसेच त्यानंतर सीसीआयकडून निर्धारीत केंद्रांवर सर्वात जास्त कापूस गाठींची उद्दीष्ठानुसार खरेदी करण्यात आली आहे. सीसीआय सोबतच

जिल्ह्यात पणन संघाकडून देखील कापूस खरेदी केली जात होती. परंतु गेल्या वर्ष-दीड वर्षापासून मनुष्यबळाअभावी बहुतांश केंद्रे बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस पडून असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा झाली होती. शेतकऱ्यांची कुचंबणा पहाता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर, नांदुरा तसेच जळगाव जिल्ह्यात जामनेर, भुसावळ, चोपडा, बोदवड, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, एरंडोल, शेंदुर्णी, धरणगाव अशी ११ कापूस खरेदी केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभासह कापूस खरेदी करण्यात आलेल्या २ कापसाचा मोबदला डीबीटी अंतर्गत थेट बँक खात्यावर मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या ८ ते १२ अंशादरम्यान आर्द्रता असलेल्या चांगल्या प्रतीच्या कापसाची केंद्रांवर खरेदी करण्यात येईल. त्यासाठी २०२४-२५ अंतर्गत कपाशी पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, आधार ई-केवायसी असलेले बँक खाते पासबूक झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदींसह नजीकच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर नोंद करावी.
-योगेश थाळनेरकर, सीसीआय, केंद्रप्रमुख, पाचोरा