लग्नानंतर हनिमूनला जाण्याची परंपरा मुख्यतः जोडप्याच्या नव्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा साजरा करणे होय. त्यासाठी जोडप्यांकडून नियोजनदेखील केलं जात. अर्थात हनिमूनसाठी जागा निवडताना आवडीनिवडी, बजेट आणि प्रवासाचा कालावधी. जर प्रवासाचा कालावधी जास्त असेल तर, एखाद्यावेळी घरच्यांचा विरोधदेखील असतो. पर्यायी घरचे जवळचे ठिकाण सुचवतात. अशावेळी वाददेखील निर्माण होत असतात. कल्याणमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावई ईबाद फालके याला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं तर, सासरा जकी खोटाल यांचा याला विरोध होता. या कारणावरून दोघांमध्ये गेल्या अनेक दिवस वाद सुरू होता. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जावई ईबाद याच्यावर सासरा जकी खोटाल याने ॲसिड हल्ला केला.
या हल्ल्यात जावई ईबाद फालके गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेनंतर सासरा जकी खोटाल पसार झालाय. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
कल्याण पश्चिम परिसरात जावई ईबाद फालके हा आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याचे महिनाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या जकी खोटाल यांच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर जावई इबादला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी तयारीदेखील केली. मात्र, सासरा जकी खोटाल याने तुम्ही काश्मीरला जाऊ नका, प्रार्थनेसाठी मक्का मदीनाला जा, असे सांगितले. यावरून जावई ईबाद व सासरा जकी या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.
जावई ऐकत नसल्याने सासरा जकी संतापला होता. काल सायंकाळी जावई ईबाद याला लालचौकी परिसर सासरा जकी याने गाठले आणि त्याच्यावर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात जावई ईबाद गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. फरार असलेला जकी खोटाल याचा शोध बाजारपेठ पोलीस घेत आहेत.