सशस्त्र दलांत होणार ‘प्रलय’चा समावेश

तरुण भारत लाईव्ह न्युज : नवी दिल्ली-  पूर्व लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणाव निर्माण झाला असतानाच १५० ते ५०० किमी मारक क्षमता असलेल्या प्रलय या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश करण्याचा निर्णय सशस्त्र दलांनी घेतला आहे.

क्षेपणास्त्राचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव प्रगत टप्प्यात असून, या आठवड्यात उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी घेण्यात येईल, असे संरक्षण मंत्रालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी मागील वर्षी २२ आणि २३ डिसेंबर रोजी करण्यात आली होती.

इतिहासात प्रथमच सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या दोन यशस्वी उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या होत्या. १५० ते ५०० किमी अंतराच्या मारक क्षमता असलेल्या प्रलयसाठी घन प्रणोदन रॉकेट मोटर आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. क्षेपणास्त्राच्या दिशादर्शक प्रणालीत अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि एकात्मिक एव्हिओनिक्सचा समावेश आहे.

प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांना पराभूत करण्याची क्षमता प्रलयमध्ये आहे. ठरावीक अंतर पार केल्यानंतर मार्ग बदलण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी
दिली.
सशस्त्र दलांमध्ये समावेश केल्यानंतर प्रलय क्षेपणास्त्र भारतीय सैन्याला शत्रूचे हवाई संरक्षण किंवा तत्सम उच्च मूल्याची लक्ष्ये पूर्णपणे नष्ट करण्याची जबरदस्त क्षमता देईल.