Army Day parade 2025 in Pune : भारतीय लष्करातर्फे ‘आर्मी डे परेड’ या सोहळ्याचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या स्थापना दिवस ‘आर्मी डे’ दरवर्षी साजरा केला जात आहे.
Army Day parade in Pune : भारतीय लष्कराचा स्थापना दिवस साजरा करण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. पुण्यात १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे समारंभ आयोजित केला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे या समारंभाचे आयोजन केले असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून लष्कराचा गौरवशाली इतिहास उलगडणार आहे. या पूर्वी हा सोहळा फक्त दिल्लीत आयोजित करण्यात येत होता. मात्र गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लष्कर दिन, नौदल दिन आणि वायुसेना दिन दिल्ली बाहेर आयोजित करण्याचा नवा पायंडा पडला आहे. त्यामागे अधिकाधिक लोकसहभागाला प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे व देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये लष्कराचे सामर्थ्य आणि शिस्त प्रदर्शित करणे हा यामागचा उद्देश आहे. २०२३ मध्ये आर्मी डे परेड बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम राजधानीबाहेर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. २०२४ मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आर्मी डे परेड आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता २०२५ मध्ये आर्मी डे परेड पुण्यात आयोजित केली जाणार आहे.
भारतीय लष्कराची स्थापना ही १५ जानेवारी १९४९ रोजी झाली होती. या दिवशी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. १९४९ मध्ये ब्रिटीश जनरल सर रॉय बुचर यांच्यानंतर करीअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. त्याच वर्षी आर्मी डे साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
पुण्यात कोठे होत आहे आर्मी डे परेड ?
पुणे हे भारताच्या लष्करी इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि साउदर्न कमांडचे मुख्यालय आहे. याशिवाय, मराठा साम्राज्याशी असलेली ऐतिहासिक नाळ आणि सैनिकी प्रशिक्षणासाठीचे केंद्र म्हणून पुण्याचा विशेष सन्मान आहे. पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) आणि सेंटर येथे ही परेड होणार आहे. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग देखील या परेडला उपस्थित राहणार आहेत.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
पुण्यात १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. यात लष्कराचे संचलन हा कार्यक्रम या सोहळ्याचं खास आकर्षण आहे. या सोबतच चित्त थरारक कवायती, शस्त्रास्त्र प्रदर्शन, हवाई कसरती, आधुनिक शस्त्र प्रणाली प्रदर्शन, प्रत्यक्ष युद्धाचे प्रात्यक्षिकं आदि कार्यक्रम आयोजित केले आहे.
महिला अग्निवीरांची विशेष कामगिरी
२०२५ च्या परेडमध्ये महिला अग्निवीरांचे विशेष योगदान दिसून येईल. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सर्व महिला संचलन तुकडी यंदा परेडमध्ये सहभागी होणार आहे. बंगळुरूमधील लष्करी पोलीस दलाच्या (सीएमपी) महिला अग्निवीरांचा संचही या परेडचा भाग असेल. कॅप्टन संध्या महला या ५८ सदस्यीय संचलनाचे नेतृत्व करणार आहेत.