खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांना अटक करा : संजय निरुपम यांची मागणी

मुंबई : महापालिकेतील खिचडी घोटाळा प्रकरणाला आज संजय निरुपम यांनी केलेल्या आरोपांनी नवी कलाटणी मिळाली.  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यात  ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी यासंदर्भात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते.  काँग्रेसमधून बाहेर पडलेले संजय निरुपम यांनीही संजय राऊत यांच्यावर या प्रकरणात आरोपांच्या फ़ैरी झाडल्या आहेत. संजय राऊत हे  खिचडी घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार असून  त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली मिळाल्याचा गंभीर आरोप करत संजय राऊत यांना अटक करण्यात यावी अशी मागणी  संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत  केला.

 

संजय राऊत यांना अटक करा

मुंबई महापालिका खिचडी घोटाळ्यात  संजय राऊत यांच्या भावाच्या, मुलीच्या नावाने चेकद्वारे रक्कम घेतले. संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात ३ लाख ५०  हजार, ५ लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात ५ लाख, १ लाख २५ हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात १४ लाख, १४  लाख, १०  लाख, १ लाख ९०  हजार, १  लाख ९०  हजार जमा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. खिचडी प्रकरणाचा तपास ED करत आहे. या तपासात स्थानिक उमेदवारासोबतच संजय राऊत यांनाही अटक करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.  ईडीकडून सुरु असलेल्या तपासाचा विस्तार व्हायला हवा. महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.