दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत गुरुवारी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 1 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता पुढील सुनावणी 1 एप्रिल 2024 रोजी होणार असून त्यांना दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सहा दिवसांच्या ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला. काल दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना कोणताही अंतरिम दिलासा नाकारला होता आणि अटक आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर नोटीस बजावली होती. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, विद्यमान मुख्यमंत्री चौकशीदरम्यान चुकीची उत्तरे देत आहेत आणि एजन्सीला गोव्यातून बोलावलेल्या काही व्यक्तींशी त्यांचा सामना करणे आवश्यक आहे. त्यामुळे ईडीने आणखी सात दिवसांची कोठडी मागितली आहे.