प्रयागराज | महाकुंभमेळ्यात सोमवारी मध्यरात्री संगम तटावर मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीच्या या हृदयद्रावक घटनेत तब्बल १० भाविकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व जखमींवर महाकुंभ नगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कशी घडली दुर्घटना?
मौनी अमावस्या निमित्त मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी जमू लागली होती. दुपारी काही भागात जमावाने बॅरिकेड्स तोडण्याचे प्रकार घडले. मध्यरात्री स्नान सुरू झाल्यानंतर संगम तटावर गर्दीचा उच्चांक गाठला. यावेळी आखाड्यांचे बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली.
रात्री दोनच्या सुमारास संगम तटावर स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडल्याने अनेकांना उठता देखील आले नाही. १५७ क्रमांकाच्या पिलरजवळ ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा : बापरे ! दोन गेंड्यांसमोर माय-लेकी जिप्सीतून पडल्या खाली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल
पंतप्रधान मोदींच्या तातडीच्या सूचना
या दुर्घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तातडीने मदत आणि बचावकार्य हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आखाड्यांनी अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय
या दुर्घटनेनंतर महाकुंभमधील १३ आखाड्यांनी मौनी अमावस्येला अमृतस्नान न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन आणि आखाड्यांच्या प्रमुखांची बैठक सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होईल.
संतप्त भाविक आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान
या दुर्घटनेमुळे महाकुंभमेळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक भाविक प्रशासनाच्या ढिल्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत आहेत. भाविकांची सुरक्षितता आणि महाकुंभचा पुढील प्रवाह सुरळीत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.