राजकारण्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो जरा इकडेही लक्ष द्या!

तरुण भारत लाईव्ह । भटेश्वर वाणी । अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या शाळांचा शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढला, शाळा डिजिटल झाल्या. याउलट परिस्थिती जळगाव मनपा क्षेत्रात आहे. शहरातील मनपाच्या तब्बल 20 शाळा बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मनपा शाळांना शासनाकडून अनुदान मिळत असते. गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा, त्यांना उत्तम शिक्षण मिळावे असा या मागील हेतू पालकांना या शाळेत आपल्या पाल्याना टाकण्यात स्वारस्य वाढेल, असे प्रयत्न असावे असेच शासनाला अभिप्रेत आहे. पण जळगाव मनपाच्या शाळांमध्ये या उलट परिस्थिती आहे. शहरात मनपाच्या सुरू असलेल्या शाळांमधून चांगले शिक्षण मिळत नसल्याने अगदी गरीबातील गरीब कुटुंबातील मुलांचे पालकही या शाळांमधून आपल्या पाल्यास शिक्षण देण्यास तयार नाहीत.
केवळ 23 शाळा जेमतेम सुरू

जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत 2017 साली 43 शाळा सुरू होत्या. यापैकी आता डिसेंबर 2022 अखेर 23 शाळाच सुरू असल्याची नोंद आहे. म्हणजे मनपा क्षेत्रातील तब्बल 20 शाळा बंद झाल्याची धक्कादायक परिस्थिती शहरात आहे.

डिजिटल प्रशिक्षण गरजेचे
लोकप्रतिनिधींच्या स्वतःच्याच शाळा असल्याने ते मनपाच्या शाळेला मोठे करतील अशी परिस्थिती नाही. यामुळेही मनपाच्या शाळा दिवसेंदिवस मागे पडत चालल्या आहे. या उलट या पाच वर्षात खासगी शाळांची संख्या वाढली आणि मनपा शाळा दिवसेंदिवस कमी होत आहेत. या शाळांचे डिजिटलाईजेशन होणे म्हणजे रात्रीच्या अंधारात सूर्याचे उगवणे असेच काहीसे स्वप्न दिसतेय. कारण शाळा डिजिटल झाल्या की त्यासाठी या शिक्षकांनाही डिजिटलचे प्रशिक्षण देणे गरजेचेच पण त्याकडे शिक्षण विभाग व मनपातही उदासिनता
दूर होणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन
चंद्रपूर महानगरपालिकेने 27 शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले होते. आदिवासी क्षेत्रातील शिक्षणाचे त्यांनी कौतुक केले. राज्यात अशा शाळा इतरही महानगरपालिकांनी सुरू करून खासगी व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. यासाठी कार्यक्रम आखण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र या सूचना देवून अनेक दिवस उलटल्यानंतरही जळगाव मनपातर्फे आपल्या शाळांमध्ये सुधारणा करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. जणू मुख्यमंत्र्यांच्या सूचनांकडेही मनपातील अधिकारी, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

साडेचार हजार विद्यार्थी 
मनपाच्या या शाळांमध्ये एकूण चार हजार 548 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या एकूण 20 इमारती आहे. याच इमारतींमध्ये सध्या या शाळा सुरू आहे. तर याच इमारतींमध्ये काही खासगी शाळादेखील सुरू आहे. या शाळांमध्ये पहिली ते पाचवीत तीन हजार 106 विद्यार्थी आहे, तर त्यांना शिकविण्यासाठी प्रति 30 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षकप्रमाणे 104 शिक्षक आहे, तर सहावी ते आठवीत एक हजार 442 विद्यार्थी आहे आणि त्यांना शिकविण्यासाठी प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्रमाणे 41 शिक्षक आहे. यानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील शाळांमध्ये 147 शिक्षक तर तीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांना वेतनासाठी दर महिन्याला महानगपालिकेच्या तिजोरीतून 47 ते 50 लाखांचा निधी द्यावा लागतो. पण एवढ्या मोठ्या खर्चानंतही एखाद दोन शाळा सोडल्या तर एकही शाळा यामधून डिजिटल नाही. यासाठी मनपाच्या अधिकार्‍यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.