भुसावळ: जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाल्यानंतर आयुष प्रसाद यांनी सोमवारी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारताच सोमवारी सायंकाळी अधिकार्यांसह भुसावळ गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामात आगामी निवडणुकीसाठी ठेवण्यात आलेल्या 20 हजार इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) ची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला तसेच काही सूचना करीत परिसरातील अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करीत दखल घेण्याच्या सूचना केल्या. नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रथमच भुसावळात आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व अधिकार्यांनी आपला परिचयही जिल्हाधिकार्यांना दिला.
गोदाम परीसरात स्वच्छतेचे निर्देश
आगामी काळात होणार्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ईव्हीएम दाखल झाले आहेत. जिल्ह्यासाठी आवश्यकतेनुसार सध्या 20 हजार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन भुसावळ तहसीलच्या गोदामात ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेचा आढावा तसेच सुरक्षेची पाहणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार नीता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता सी.डी.तायडे, पालिका उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, सार्वजनिक बांधकाम अभियंता रवींद्र बाविस्कर, नायब तहसीलदार अंगद आसटकर आदींची उपस्थिती होती.
माध्यमाच्या प्रतिनिधींना असभ्य वागणुकीने संताप
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाहणी दौर्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या शहरातील पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. यासोबत असभ्य वर्तवणूक करून पत्रकारांना बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे पत्रकार बाहेर निघाले. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली.