जळगाव : अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचार्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचारी यांना १३ हजाराहून २५ हजार मानधन वाढ करण्यात आली त्याच प्रमाणे तुमचा वकील म्हणून राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत (तुम्हाला) न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विभागाच्या गट व समूह कर्मचाऱ्यांनी असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी मानधन वाढ केल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची आज जळगाव येथे वार्षिक राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास निकम व राज्य सचिव, जयंत वर्मा तसेच राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्ह्याच्या वतीने जितेंद्र महाजन व शिरीष तायडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रास्ताविक राज्यध्यक्ष विलास निकम यांनी केले आणि आभार जिल्हाध्यक्ष सपना राजपूत यांनी मानले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणारे सर्व योजना व उपक्रम हे गावपातळीवर यशस्वी पणे राबविण्याचे काम हे सर्व गट समन्वयक, समुह समन्वयक यांनी सक्षमपणे काम करून विभागाचे नावलौकिक वाढवावा. येणाऱ्या काही दिवसात आपण सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येईल. आणि राज्यातील सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी मी मंत्री म्हणून नाही तर तुमचा वकील म्हणून भूमिका बजावणार असून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले . यावेळी सर्व कर्मचाऱ्या मध्ये उत्सवाचे वातावरण होते.