चेन्नईतील ‘ॐ’कार वैदिक मंत्राच्या आकारातील अष्टलक्ष्मी मंदिर

तरुण भारत लाईव्ह न्यूज । प्रा.डॉ.अरुणा धाडे ।

 भारत भेटी दरम्यान एकदा अचानक चेन्नईला जाण्याचा योग आला. वेळेअभावी तिथल्या मंदिरांची फारशी माहिती मिळवता आली नसल्याने ‘पुढचं पुढे बघून घेऊ’ म्हणत चेन्नईला पोहोचलो. चेन्नईला बे-ऑफ-बेंगालचा सुंदर समुद्र किनारा आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक ‘अष्टलक्ष्मी मंदिर.’ याच समुद्रकिनारी आहे. मंदिर समुद्राच्या इतक्या जवळ आहे की भरतीच्या वेळी सागर लाटा थेट मंदिरात येवून धडकतात. लक्षपूर्वक ऐकलं तर मंदिरात सागरलाटांचा प्रतिध्वनीसुद्धा ऐकू येतो. अथांग पांढरा समुद्र आणि विस्तीर्ण निळ्या आकाशाच्या मधोमध चटकदार रंगांचं हे मंदिर म्हणजे चकाकत्या विशाल शिंपल्यात सप्तरंगी मोतीच जणू!
या मंदिराची विशेषताः त्याच्या वास्तुरचनेत आहे. ’ॐ’ ह्या वैदिकमंत्राच्या आकारातील मंदिराची रचना कल्पकतेने आणि शास्त्रोक्त पद्धतीने अशी केली आहे की, कोणत्याही गर्भगृहावर पाय न ठेवता लक्ष्मीच्या अष्टरूपाचे सहज दर्शन घडावे.
लोकमान्यतेनुसार लक्ष्मीला संपत्ती, यश, समृद्धी, शौर्य, धैर्य, ज्ञान, अन्न आणि संतती ह्या अष्टतत्वांचे दैवत मानलं गेलं. इथे लक्ष्मीची आठरूपे, नऊ गर्भगृहांमध्ये चार पातळ्यांवर विराजमान आहेत. दर्शनाची सुरुवात दुसर्‍या मजल्यावरून लक्ष्मी विष्णूच्या प्रथम दर्शनाने होते. लक्ष्मी श्रीविष्णूच्या काळ्या पाषाणातील विशाल आकर्षक मूर्ती चित्तवेधक आहेत. रेखीव चेहरे, कमल दलासारखे सुंदर नयन, अणकुचीदार नाक व हनुवटी फार मोहक वाटतात. संपूर्ण शरीर सौष्ठव भरतनाट्यातील नर्तकनर्तिकेसारखे वळणदार बांधणीचे आहे.

दुसर्‍या मजल्यावरून तिसर्‍या मजल्यावर आल्यावर ‘संथालक्ष्मी’, ‘विजयालक्ष्मी’, ‘विद्यालक्ष्मी’ आणि ‘गजलक्ष्मी’ अशी चार मंदिरे आहेत. संथालक्ष्मी आईच्या रूपात आहे. तिच्या डोळ्यातील प्रेमळ मातृत्व भाव आपण मूर्तीत बघतोय हेच क्षणभर विसरायला होतं. आपली प्राचीन भारतीय शिल्पकला सौंदर्यासोबतच मानवी ‘भावभावना’सुद्धा मूर्तीत दाखवू शकते, याचे अप्रूप वाटत असतानाच विजयालक्ष्मीचं मंदिर समोर येतं. चकाकदार कृष्ण पाषाणात विजय प्राप्त मुद्रेत ती प्रसन्न दिसते. पुढे दोन्ही हातात वेदपुराण घेतलेल्या विद्यालक्ष्मीला सरस्वतीच्या रूपात बघताना थोडं आश्र्चर्य वाटतं! ग्रामीण भागात विशेष पुजली जाणारी पशुधनाची देवी ‘गजलक्ष्मी’ स्थूल पण रुबाबदार वाटते.

चौथ्या मजल्यावर आल्यावर एका हातात धान्यकलश आणि एका हाताने आशीर्वाद देत असलेल्या ‘धान्यलक्ष्मीचं’ दर्शन होतं. तिथून आपण पहिल्या मजल्यावर येतो. इथे पहिले मंदिर :आदिलक्ष्मी’चं, दुसरं धन, ऐश्र्वर्य, सुख, संपत्ती देणार्‍या ‘धनलक्ष्मी’चं आणि तिसरं ‘ऐहिक सुख लाभले तरी त्याचा उपभोग धैर्यपूर्वक करावा, असा आशीर्वाद देणार्‍या ‘धेर्यलक्ष्मी’चं आहे.

सर्व अष्टलक्ष्मींचे दर्शन झाल्यावर एक गोष्ट आपल्याला अचंभित करते की, अष्टलक्ष्म्या विविधरुपी, विविधांगी असल्या तरी त्यांच्या रूपात कमालीची साम्यता आहे. पाषाण शिल्पात लक्ष्मीचे अष्टरूप बघताना ते एकाच देवीचे वाटावे हे केवळ सिद्ध शिल्पकारच साधू शकतो.

लक्ष्मीशिवाय या मंदिरात महाविष्णू उभे, बसलेले आणि झोपलेले अशा तीन वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. पुराण कथेनुसार समुद्रमंथनातून जी ‘चौदा रत्ने’ बाहेर पडली त्यातील एक ‘रत्नलक्ष्मी’ होती. म्हणूनच कदाचित लक्ष्मीचं जन्मस्थान सागराला मानलं गेलं असावं. मुंबई महालक्ष्मीचं वास्तव्यही सागर किनारीच!

मंदिराच्या बाहेर पूजा साहित्याच्या दुकानात गुलाबी रंगांची सुंदर कमळाची फुले विकायला होती. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबाहेर विकायला असतात अगदी तशीच. दोन्ही मंदिरं हजारो किलोमीटर दूर होती पण मान्यता, आस्था, श्रद्धा एकच होती.