---Advertisement---
जळगाव : सर्वसामान्यांचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हापरिषद गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच तालुकास्तरावर पंचायत समिती गणासाठी सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी आरक्षण सोडत पार पडली. यात जिल्ह्याच्या पूर्व भागात विशेषता रावेर आणि चोपडा तालुक्यातील गट गणांसाठी अनुसूचीत जाती व जमातीसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या 68 गट, पंचायत समितीच्या 154 गणांसाठी सोडत जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेसाठी 77 गट आणि पंचायत समितीसाठी 154 गण आहेत. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 9 गट आणि 18 गण आहेत, तर बोदवड तालुक्यात सर्वात कमी 2 गट आणि 4 गण आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात सोमवार 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या 77 गटांसाठी अनुसूचीत जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण गटातील महिला उमेदवारांसाठी आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली.
तीन गट अनु.जाती महिलासांठी
यात जळगाव जिल्हा परिषद गटांसाठी अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी सहा गट आरक्षीत आहेत. यात निंभोरे बुद्रुक, वाघोड ता. रावेर, कंडारी ता भुसावळ, अंतुर्ली ता.मुक्ताईनगर, वाघोदे बुद्रुक ता. रावेर, आणि निभोरा खुर्द यांचा समावेश आहे. यात निंभोरा बुद्रुक ता.रावेर, वाघोद ता रावेर आणि वाघोदा बुद्रुक असे तीन गट अनुसूचीत जाती महिलासांठी आरक्षीत जाहिर झाले आहेत.
अनु. जमाती महिलांसाठी आठ गट
अनुसूचीत जमाती गटांसाठी विरवाडे, हिंगोणे किनगाव खुर्द, धानोरे, केऱ्हाळे बुद्रुक, कानळदा, घोडगाव, चहार्डी, पिंप्री खुर्द, अडावद, कुऱ्हे बु, आसोदा आणि चिनावल असे गट आहेत. त्यापैकी अनुसूचीत जमाती महिलांसाठी कासोदा, ता एरंडोल, चहार्डी, अडावद, घोडगाव ता.चोपडा, चिनावल ता. रावेर, किनगाव बुद्रुक ता यावल, कानळदा आणि आसोदा ता.जळगाव असे आठ गट अनुसूचीत जमाती महिलांसाठी आरक्षीत झाले आहेत.
नामाप्र महिलांचे 9 गटातून प्रतिनिधीत्व
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पातोंडा, दहिवद ता. अमळनेर, घोडेगाव, मेहूणबारे, टाकळी प्र.चा. पातोंडा, ता.चाळीसगाव, म्हसावद ता.जळगाव, शहापूर ता.जामनेर, म्हसवे, शिरसोदे ता.पारोळा, कासोदा, विखरण, ता.एरंडोल, पिंपळगाव बुद्रुक, लिहे ता पाचोरा, नाडगाव ता.बोदवड, पाळधी ता. जामनेर, नेरी दिगर, ता.जामनेर, भालोद ता यावल असे 18 गट नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आहेत. त्यापैकी नामाप्र महिलांसाठी कासोदा ता. एरंडोल, पिंपळगाव बुद्रुक ता. पाचोरा, दहिवद, पातोंडा ता.अमळनेर, मेहूणबारे ता. चाळीसगाव, पातोंडा ता. चाळीसगाव, शहापूर ता.जामनेर आणि पाळधी ता. जामनेर असे 9 गट राखीव जाहिर झाले आहेत.
14 गटातून सर्वसाधारण महिलांसाठी संधी
सर्वसाधारण गट महिलांसाठी बेटावद बुद्रुक ता.अमळनेर, लोहटार ता.पाचोरा, उंबरखेडे ता. चाळीसगाव, लोहारा ता.पाचोरा, रांजणगाव ता.चाळीसगाव, मांडळ ता. अमळनेर, शेलवड ता. बोदवड, तोंडापूर ता.जामनेर, कजगाव ता.भडगाव, पहूर पेठ ता.जामनेर, तामसवाडी ता.पारोळा, कुसूंबे खुर्द ता.जळगाव, ऐनपूर ता.रावेर, कळमसरा ता.पाचोरा आणि पाळधी खुर्द ता. धरणगाव अशा 14 जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत.
यावेळी जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीसाठी डॉ. राधेश्याम चौधरी नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, मनोहर गिरधर पाटील, संजय श्रावण पाटील, प्रभाकर सोनवणे, आर.जी. पाटील, दिलीप खोडपे, मधुकर काटे, संजय पवार, योगेश देसले यांच्यासह भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस अजीत पवार गट, भारतीय कॉग्रेससह माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
पंचायत समिती गणातून अनुसूचीत जाती एक, जमाती, नामाप्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रत्येकी दोन गणांसाठी आरक्षीत जळगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीसाठी 10 गण संख्या आहेत. यात पंचायत समितीच्या दहा गणांसाठी जळगाव तालुका पंचायत समिती सभागृहात उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार डॉ.शितल राजपूत, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत अनुसूचीत जाती जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गासह सर्वसाधारण खुला गट महिलांसाठी आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली. यात चक्राकार पद्धतीने काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार कानळदा गण अनुसूचीत जाती महिला गटासाठी आरक्षीत आहे. भोकर आणि ममुराबाद अशा दोन गणासाठी अनुसूचीत महिला गटाचे आरक्षण जाहिर झाले आहे. तसेच भादली बुद्रुक आणि मोहाडी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण जाहिर झाले आहे. याशिवाय आसोदा आणि कुसुंबे खुर्द गणातून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण आहे. तर म्हसावद, शिरसोली प्र.न. आणि धानवड पंचायत समिती गणातून सर्वसाधारण गटासाठी आरक्षण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे प्र.न. जिल्हा परिषद गटाची जागा ‘सर्वसाधारण महिला राखीव’ ठरलेली असून, हा निर्णय मला आनंददायी वाटतो. शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेला 50 टक्के आरक्षणाचा निर्णय हा सामाजिक समतेकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामीण भागातील सक्षम, शिक्षित आणि जनसेवक वृत्तीच्या महिला आता पुढे येत आहेत, हे लोकशाहीसाठी सकारात्मक लक्षण आहे. आमच्या कुऱ्हे प्र. न. गटातील महिलांना या आरक्षणातून नेतृत्वाची संधी मिळाली आहे. त्या या संधीचा योग्य उपयोग करून कार्यकर्तृत्वाने जि.प. गटाचा सन्मान वाढवतील, असा विश्वास आहे.”
–विश्वनाथ पाटील, माजी गटनेते, जि.प. जळगाव