आसाममध्ये राज्य मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द

नवी दिल्ली : आसाम सरकारने राज्य मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५ रद्द केले असून हे दोन्ही कायदे आता आसाम रिपीलिंग बिल २०२४ द्वारे बदलले जातील, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी केली आहे. मुख्यमंत्री सर्मा म्हणाले की, राज्य सरकारने बालविवाहाविरूद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय करून राज्यातील भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत आसाम निरसन विधेयक २०२४ द्वारे आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा १९३५ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५ आणि आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी नियम १९३५ रद्द करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. येत्या पावसाळ्यात हे विधेयक आसाम विधानसभेत मांडले जाईल. आसाम मंत्रिमंडळाने राज्यात मुस्लिम विवाहांच्या नोंदणीसाठी कायदा आणण्याचे निर्देश दिले आहेत. या विषयावर विधानसभेतही चर्चा होणार आहे, असेही मुख्यमंत्री सर्मा यांनी म्हटले आहे.