मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाने आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने मागणी केलेल्या जागांचा समावेश करण्यात आला आहे. हीबाब समोर येताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्याकडे देखील यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. या पत्राचा फटका मातोश्रीवर जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांना बसला आहे.
काय आहे वाद
महायुतीतर्फे उमेदवारांची यादी जाहीर रण्यात येत आहे. महाविकास आघाडीने देखील आपल्या काही उमेद्वारांची नावांची यादी जाहीर केली आहे. असे असतांना महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपचा घोळ अद्याप सुरूच आहे. शिवसेना उबठाने काँग्रेसच्या १२ जागांवर उमेदवारांची घोषणा केली या जागांमध्ये मुंबई आणि विदर्भाचा समावेश आहे.
या यादीत काँग्रेसने दावा केलेल्या १२ जागांचा समावेश आहे. त्या १२ जागा मुंबई आणि विदर्भातील आहे. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पत्र लिहिले. जागा वाटप करतांना या जागांवर कोण लढणार आहे याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र , शिवसेना उबाठा गटाने मित्र पक्षांना विश्वासात न घेता त्यांची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आल्याचा काँग्रेसतर्फे पत्राद्वारे आरोप केला आहे.
काँग्रेसच्या पत्रामुळे उद्धव ठाकरे हे कमालीचे निराश झाले आहेत. यापुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत कोणतीही चर्चा करायची नाही? असा मानस त्यांनी पक्षातील नेत्यांपुढे बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्या नाराजीचा सामना मातोश्रीवर येणाऱ्या काँग्रेस नेत्यांना करावा लागला. यापूर्वी उद्धव ठाकरे काही जागा सोडण्यास तयार झाले होते. परंतु, या पत्रानंतर त्यांनी माघार न घेण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.