Assembly Election 2024:  महाविकास आघाडी कधी जाहीर करणार उमेदवारांची यादी, नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं..

जळगाव : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून विविध राजकीय पक्षांकडून याची तयारी केली जात आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने रविवारी विधानसभा निवडणुकांसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अद्यापही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपने उमेदवार जाहीर केले तर शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या निवडणूक समितीची आज बैठक होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतर्फे उद्या २२ ऑक्टोबर रोजी जागा वाटप जाहीर केले जाईल असे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचं ठरलं आहे, उद्या पहिली यादी जाहीर केली जाईल. महाविकास आघाडीतील तीघे पक्ष मिळून उद्या संध्याकाळी यादी जाहीर केली जाईल.

महाविकास आघाडीत वाद

मागील काही दिवसांत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरुन रणकंद मजल्याचे पाहायला मिळत आहे. यात शिवसेना उबाठा गट व काँग्रेस यांच्या नेत्यामंध्ये वाकयुद्ध रंगल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परंतु, नाना पटोले यांनी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरुन कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितलं. नाना पटोले म्हणाले की, “काँग्रेस व शिवसेनेत कोणतेही वाद नाहीत. कशाला उगाच आमच्यात भांडणं लावताय? आम्ही नसीम खान यांना शरद पवारांकडे पाठवलं होतं. आमची यादी त्यांच्याकडे होती. ते उद्धव ठाकरेंच्याही संपर्कात होते. आमची मुंबईतही चर्चा आहे. काल काही कारणास्तव आमची बैठक रद्द झाली. पण आज बैठक आहे. विदर्भातील १२ जागांबाबतही महाविकास आघाडीत वाद नाहीत. शिवसेना आमच्याच जागा मागते वगैरे कोणतीही चर्चा झालेली नाही. मेरिटवर उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली”, असं नाना पटोलेंनी यावेळी स्पष्ट केलं.