जळगाव : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. यात २२९ जागा जिंकून स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यात भाजपच्या १३२ जागा निवडून आल्याने राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळ निवडीसाठी नावे अंतिम करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळण्याचे संकेत आहेत. त्यात विद्यमान मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद पुन्हा मिळण्याबाबत शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा निवडून येणारे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले असून मंगळवारी शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महायुतीला मतदारांनी सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी या दोन दिवसाच्या काळात होणाऱ्या हालचालीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या तीन कॅबिनेट मंत्रीपदासह राज्य मंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार सुरेश भोळे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर राज्यमंत्री पद कोणाला मिळणार हे ठरणार आहे. जिल्ह्यात ११ जागावर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यात भाजपने ५ तर शिवसेना शिंदे गटाने ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने एक जागेवर वर्चस्व कायम ठेवले. जिल्ह्यात प्रथमच महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे या आघाडीत सहभागी सर्वच पक्षांना पक्ष बांधणी व रचना यावर काम करावे लागणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना पुन्हा नव्याने पक्षाची मोट बांधणी करावी लागणार आहे.
आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, किशोर पाटील राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत
जळगाव जिल्ह्यात सर्वच जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाची मोहर लावली आहे. त्यामुळे साहजिक जिल्ह्याला मंत्रीपदासाठी झुकते माप मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य मंत्री पदाच्या शर्यतीत भाजप आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आणि एक शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शर्यतीत आहेत. यापैकी कोणाला राज्यमंत्री पद मिळणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून हॅट्रीक करणारे आमदार भोळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलल जात आहे. मात्र महायुतीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला राज्य मंत्री येते. त्यानुसार महायुतीतील त्या पक्षातील आमदारांना या पदावर संधी मिळणार आहे