चाळीसगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांचे छायाचित्र तसेच प्रचाराचे वाक्य असलेले फलक लावलेले पांढऱ्या रंगाचे वाहन चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याबाहेर गेल्या अनेक दिवसांपासून उभे असून, ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. वाहनावरील फलक व छायाचित्रामुळे ठाकरे गटातील इभ्रत चहाट्यावर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच शहरात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख किरण घोरपडे यांचे ते वाहन असल्याचे समजते. अनेक दिवसांपासून हे वाहन भरचौकात उभे असून, त्याच्यावर ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांचे छायाचित्र व फलक आहेत, त्यामुळे असाही प्रचाराचा फंडा राबविला जात आहे काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
एकीकडे उन्मेष पाटील हे शहरात गुन्हेगारीवर बोलत आहेत, भयमुक्त चाळीसगाव शहर घडविण्याची भाषा करीत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे, दहशत वाढली आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या युवासेना तालुकाप्रमुखाला गावठी बंदूक उगारून दहशत माजविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो जेलवारी करीत असल्याचे समजते. मात्र, असे असले तरी संबंधित वाहनावरील उमेदवाराचे छायाचित्र व पक्षाची जाहिरात काढायला सोयीस्कररीत्या विसरले की काय ? अशीच चर्चा होऊ लागली आहे किंवा उमेदवाराचे या गोष्टीला समर्थन तर नाही ना, असे आता बोलले जाऊ लागले आहे. मात्र, संबंधित वाहनाबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत असून, याचा परिणाम ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या भयमुक्त चाळीसगाव या प्रचारावर होणार असल्याचे बोलले जाते. एकंदरीत भाषणात उन्मेष पाटील हे शहरातील गुंडगिरी, दहशतीवर व हुकूमशाहीवर बोलत असून, त्यांच्या दिव्याखाली अंधार असल्याचे यानिमित्ताने आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही व कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे अधिकच याबाबत साशंकता निर्माण झाल्याचे दिसून येते.