Assembly Elections 2024 । शिंदे गटाने फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग; धडगावात…

नंदुरबार : महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या विरोधकांना बंद करायच्या असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अशा प्रवृत्तींपासून जनतेने सावध रहावे. सर्वसामान्य जनतेच हे सरकार आहे. महायुती सरकारच्या कुठल्याही योजना बंद होणार नसून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच शिवसैनिकांनी लागावे, असे आवाहन शिवसेनेचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

आदिवासींच आरक्षण हटवण्यात येणार असल्याच्या अपप्रचार लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी केला. आदिवासींच्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही. विरोधकांचा अपप्रचाराला बळी न पडण्याचे आव्हानदेखील खासदार शिंदे त्यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडगाव येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी खासदार डॉ. शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. वेळ कमी असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कामाला आतापासूनच शिवसैनिकांनी लागण्याचे आवाहन खासदार शिंदेंनी केल्याने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.

यावेळी खासदार शिंदे म्हणाले, महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या विरोधकांना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी पीआयएल न्यायालयात दाखल केला आहे. आमचे सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू असं काँग्रेसने न्यायालयात सांगितलं आहे. अशा प्रवृत्तींपासून जनतेनं सावध रहावं. ज्या महिलांनी जुलै नंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील त्यांच्या खात्यात आता थेट चार महिन्यांचे पैसे प्राप्त होतील. राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून पैसे टाकणारे हे पहिले सरकार आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, जि. प. सदस्य विजय पराडके, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, अक्राणी पं.स उपसभापती भाईदास अत्रे, धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, नंदुरबार पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जि.प.चे माजी अध्यक्ष वकील पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख विद्या वळवी, युवा सेनाप्रमुख योगेश पाटील, कात्रीचे सरपंच संदीप वळवी, दिलवरसिंग पावरा, राकेश पावरा, फत्तेसिंग पावरा, रघु पावरा, रवींद्र पराडके आदी उपस्थित होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पात्रता टीकाकारांनी ओळखावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, अशा घणाघात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही – खासदार शिंदे
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी आदिवासी समुदायाला भडककावण्याचे काम केलं. आदिवासींच्या आरक्षण हटवण्यात येणार असल्याच्या अपप्रचार करण्यात आला. आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही. विरोधकांवर विश्वास ठेवू नका. आदिवासींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.