सहायक महसूल अधिकाऱ्यास १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

---Advertisement---

 

पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयातील सहायक महसूल अधिका-यास १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दोनला उपविभागीय कार्यालयातीलच ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईने पाचोरा शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, यापूर्वदिखील आरोपीने तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारले आहेत. पोटखराब क्षेत्र गाव नमुना नं.७/१२ वर वहितीखाली लावणे कामी तक्रार दाराकडे एकूण १५ हजार रुपयांची मागणी आरोपितर्फे करण्यात आली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे (मौजे कोकडी, ता. पाचोरा) शिवारात पोटखराब क्षेत्र आहे. ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले असून, त्यावर पीक लागवड करीत आहेत. परंतु सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७/१२ मध्ये पोटखराब म्हणून दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि शेतीविषयक कर्ज मिळत नाही. म्हणून हे पोटखराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहितीखाली लावण्याकामी तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे ४ सप्टेंबर रोजी पाचोरा उपविभागीय कार्यालयात अर्ज केला.

अर्जात नमूद केलेले काम करुन देण्यासाठी या कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी हे काम करुन देण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, त्यावेळी तक्रारदाराची इच्छा नसताना त्यांनी गणेश लोखंडे यांना पाच हजार रुपये रोख दिले होते व बाकी १० हजार रुपये दिल्यावर तुमचे काम करुन देईल, असे गणेश लोखंडे यांनी सांगितले होते.

परंतु तक्रारदारास त्याच्या मागणीप्रमाणे बाकी असलेले १० हजार रुपये देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी ९ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जळगाव येथे तक्रार दिली. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी केली असता गणेश लोखंडे यांनी यापूर्वी पाच हजार रुपये स्वीकारल्याचे कबूल करून बाकी असलेले १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे १० सप्टेंबर
रोजी गणेश लोखंडे यांनी तक्रारदाराशी चर्चा करून मागणी केलेल्या १५ हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेपैकी दुसरा हप्ता १० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ लोखंडे यांना तक्रारदाराकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रंगेहात पकडले. आरोपीस ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ०७ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

यांनी केली यशस्वी कामगिरी

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस शिपाई भूषण पाटील, पोलीस शिपाई राकेश दुसाने, पोलीस शिपाई अमोल सूर्यवंशी यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---