---Advertisement---
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ वास्तव्य केल्यानंतर पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांच्या दृष्टीवर परिणाम होतो आहे. दीर्घकाळाच्या मोहिमांवरून परतलेल्या जवळपास ७० टक्के अंतराळवीरांना दृष्टीची समस्या येत असल्याचे दिसून आले. यामुळे नासाच्या शास्त्रज्ञांना अंतराळातील वजनरहित वातावरणाचा दृष्टीवर कोणता परिणाम होतो यावर संशोधन करीत आहेत. यातील सर्वांत भीतीदायक बाब म्हणजे, दृष्टीवर होणारे हे परिणाम कायम स्वरूपाचे असण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सहा महिने वास्तव्य केलेल्या डॉ. सारा जॉन्सन यांना त्यांच्या मोहिमेदरम्यान ही समस्या लक्षात आली. अंतराळात जाण्यापूर्वी जो मजकूर त्यांना अतिशय स्पष्टपणे दिसत होता, तो पृथ्वीवर परतल्यानंतर अस्पष्ट दिसू लागला. अशा प्रकारची घटना केवळ तिच्यासोबतच नव्हे, तर अनेक अंतराळवीरांना दृष्टी अंधुक होणे, वाचण्यास आणि दूरच्या वस्तू दिसण्यास त्रास जाणवू लागला. यातील काही बदल पृथ्वीवर परतल्यानंतरही वर्षानुवर्षे टिकतात, असे निदर्शनास आले.
‘स्पेसफ्लाइट असोसिएटेड न्यूरो-ऑक्युलर सिंड्रोम’ नावाची ही स्थिती दीर्घकालीन अंतराळ प्रवासातील एक प्रमुख चिंता आहे. मोशन सिकनेस किंवा स्नायूंचे नुकसान यासारख्या इतर अवकाश संबंधित समस्या पृथ्वीवर आल्यावर ठीक होतात. मात्र, दृष्टीचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. ही समस्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे उद्भवते. जिथे गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीरातील द्रव वरच्या दिशेने सरकतात. यामुळे चेहऱ्यावर सूज येते आणि कवटीच्या आत दाब वाढतो. या दाबामुळे नेत्रगोलकाचा आकार बदलू शकतो आणि दृकतंत्रिका (ऑप्टिक नर्व्ह) फुगू शकते. परिणामी, दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
मंगळ मोहिमेत अंतराळवीरांना धोका
हे बदल कालांतराने स्थिर होतात की आणखी बिकट होतात हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. गंभीरपणे कमकुवत दृष्टी असलेल्या अंतराळवीरांमुळे संपूर्ण मंगळ मोहिमेला धोका होऊ शकतो, असे नासाचे प्रमुख दृष्टी संशोधक डॉ. मायकल रॉबर्ट्स यांनी या बाबींवर भर देत म्हटले. मंगळ मोहीम दोन ते तीन वर्षे चालू शकते. परिणामी, ‘स्पेसफ्लाइट असोसिएटेड न्यूरो-ऑक्युलर सिंड्रोम’ कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नासा शोधतोय् विशेष कॉन्टॅक्ट लेन्स
अंतराळवीरांच्या दृष्टीवर परिणाम होऊ नये, यासाठी नासा विशेष कॉन्टॅक्ट लेन्स, द्रवपदार्थाचा दाब कमी करण्यासाठी औषधे आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायामाच्या दिनचर्यांसह उपायांचा शोध घेत आहे. ते डोळ्यांसाठी पृथ्वीसारख्या दाबाची नक्कल करण्यासाठी ‘व्हिज्युअल इम्पेअरमेंट इंट्राकॅनियल प्रेशर चेंबर’ (व्हीआयआयपी) नावाच्या उपकरणाची देखील चाचणी करत आहेत.