गोलाणी खून प्रकरण : बाईक फिरायला घेऊन गेल्यानेच वाद, रात्री गोलाणीला बोलवून केला सोपानचा गेम

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या गोलाणी मार्केटच्या तळ मजल्यावर रविवारी रात्री तरुणाची चोपरने भोसकून हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या ४ तासात गुन्हा उघडकीस आणला आहे.  मयत सोपान हटकर याची स्पोर्ट बाईक बाहेरगावी फिरायला घेऊन गेल्यानेच वाद सुरू झाला. दुचाकी परत करण्यापूर्वी सोपानने शिवीगाळ सुरू केल्याने चौघांनी त्याचा गेम केल्याचे समोर आले आहे.

नेमकी घटना काय?

शहरातील हरी विठ्ठल नगरात सोपान हटकर हा आईसोबत राहत असून तो सेंटरींग तसेच मिळेल ते मजुरी काम करुन तो उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान, सोपानने काही दिवसांपूर्वी फायनान्सवर हप्त्याने बाईक घेतली होती. बाईक काही हप्ते थकल्याने कंपनीवाले ही दुचाकी ओढून घेऊन जातील या भितीने सोपानने त्याची दुचाकी त्याच्या जळगाव तालुक्यातील रिंगणगाव येथील रहिवासी मामा सुपडू अर्जून पाटील यांच्या शेतातील खळ्यात लपवून ठेवली होती.

मात्र, सोपानने लपवलेली बाईक त्याचे मित्र गोविंदा शांतीलाल झांबरे आणि ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू हे परस्पर घेऊन तिचा वापर करत होते. याबाबत त्याने रागावले देखील होते. त्यानंतर २६ मार्च रोजी दुपारी गोविंदा झांबरे आणि ज्ञानेश्वर हे दोघंही सोपानची बाईक घेऊन पारोळा येथे लग्नाला गेले होते. सोपानला याबाबत समजताच त्याने फोन करुन दोघांना जळगावला बोलावले होते.

त्यानुसार दोघांनी सोपानला रात्री गोलाणी मार्केट येथे बाईक घेण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार सोपान त्याची बाईक घेण्यासाठी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट येथे गेला. याठिकाणी दुचाकी घेण्यावरुन त्याचा गोंविदा आणि ज्ञानेश्वर यांच्याशी वाद झाला. या वादातून दोघांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहूल भरत भट आणि करण सुभाष सकट या चार जणांनी सोपानवर चॉपरने सपासप वार करत त्याची हत्या केली.

या प्रकरणी मयत सोपानची आई सरलाबाई गोविंदा हटकर (वय ४७) यांच्या फिर्यादीवरुन गोविंदा शांतीलाल झांबरे (रा. नाथवाडा), ज्ञानेश्वर दयाराम लोंढे ऊर्फ नानू (रा. कंजरवाडा) राहूल भरत भट (रा. खोटेनगर) आणि करण सुभाष सकट (रा. बी.जे.मार्केट कोंडवाडा, जळगाव) या चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.