लखनौ : पोलिस आयुक्तालय प्रयागराज आणि राज्य सरकारला उत्तर प्रदेशमध्ये ऑपरेशन माफिया अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईत मोठे यश मिळाले आहे. माफिया अतिक अहमदची ५० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आता राज्य सरकारच्या मालकीची झाली आहे. आयुक्तालय पोलिसांनी अवघ्या ११ महिन्यांत जप्तीपासून जमीन सरकारी करण्यापर्यंतची कारवाई विक्रमी वेळेत पूर्ण केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ जिल्हा न्यायालयाने हुबलालच्या नावावर खरेदी केलेली जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती विनोद कुमार चौरसिया यांनी पोलिस आयुक्तांची कारवाई योग्य आणि न्याय्य असल्याचे म्हटले आणि अधिग्रहित मालमत्ता सरकारच्या नावे हस्तांतरित करण्यास सांगितले.
या आदेशाचे पालन करून प्रयागराजचे जिल्हा दंडाधिकारी आता खतौनी येथील हुबलालच्या जागी राज्य सरकारचे नाव नोंदवतील. अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच कारवाई मानली जात आहे. यामुळे माफिया अतीक टोळीच्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माफिया अतिक याच्यावर गँगस्टर ॲक्ट दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिकची सुमारे २४ एकर जमीन हुबलाल यांच्या नावावर असल्याचे उघड झाले.
चौकशीत हुबलालने सांगितले की, २०१५ मध्ये अतिकने गरीब शेतकऱ्यांची जमीन त्याला धमकावून आपल्या नावावर करून घेतली होती. यानंतर, दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी, गँगस्टर कायद्याच्या कलम १४ (१) अंतर्गत जमीन जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची कागदपत्रे पोलिस आयुक्तालयात पोहोचली, तेथे अतिकच्या वारसाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली, मात्र तीन महिने उलटूनही ते कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. यानंतर जिल्हा न्यायालयात कागदपत्रे पाठवण्यात आली. तेथे झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने गँगस्टर कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईला दुजोरा देत मालमत्ता राज्य सरकारला देण्याचे आदेश दिले.
उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी १५ एप्रिलला अतिक अहमदची हत्या झाली होती. उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गेल्या वर्षी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना रिमांडवर घेतले होते. प्रयागराजमध्ये दि. १५ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलीस अतिक आणि त्याच्या भावाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत होते, त्याचवेळी पत्रकार म्हणून भासवणाऱ्या अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी या तीन हल्लेखोरांनी दोघांनावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.