ATM बाहेर नागरिकांची उडाली झुंबड, बॅंकेचे निघाले दिवाळे, चक्क प्रत्येक विड्रॉलमागे ६०० रुपये जास्त

महाराष्ट्रातील एका बँकेच्या एटीएमबाहेर अक्षरश: झुंबड उडाली होती. कारणही तसंच होतं. एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे तिथे झालेली एक तांत्रिक चूक, पण त्यामुळे पैसे काढणाऱ्यांची मात्र चैन होती. असं नक्की घडलं तरी काय ? तर गणेश चतुतर्थीच्या एक दिवस आधीच ५ सप्टेंबरला ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून प्रत्येक विड्रॉलमागे ६०० रुपये अतिरिक्त मिळत असल्याने लोकांनी पैसे काढण्यासाठी झुंबड केली. ही बातमी कळताच शहरातील नागरिकांनी तेथे धाव घेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील खापरखेडा भागात ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. तेथे काही तांत्रिक चुकींमुळे एटीएममधून जास्त पैसे येत होते. ५ सप्टेंबरच्या दुपारी ही घटना उघडकीस आली. तेथे पैसे काढायला गेल्यावर ज्या लोकांनी ५०० रुपये काढले त्यांना ११०० रुपये मिळत होते. तर ज्यांनी १००० रुपये काढले त्यांना थेट १६०० रुपये मिळत होते. म्हणजेच पैसे काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तब्बल ६०० रुपये जास्त मिळत होते. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर शहरातील इतर नागरिकांनीही ताबडतोब तेथे धाव घेत पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

तांत्रिक अडचणीमुळे एटीएमला बसला फटका

एटीएम मध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं बोलल जात आहे. खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळवले. तेव्हा दुपारी एटीएम बंद करून दुरूस्ती करण्यात आली. मात्र तोपर्यंत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे निघून गेल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले.

दुपारी एटीएम बंद करत दुरुस्ती करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी सात वाजता एटीएम सुरू झाले. स्थानिक नागरिक अरुण महाजन यांनी या सगळ्या प्रकार वेळीच लक्षात आणून दिला नसता तर यामध्ये आणखी फटका बँकेला बसला असता.