शहराध्यक्षांवर हल्ला.. १३ जणांना अटक; पोलिसांचं आवाहन!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । सावदा येथील भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांच्यावर ५ पाच दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी अद्याप १३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून कुणीही अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता तसेच सलोखा कायम राखावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांना दि.२८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सावदा येथील कत्तलखान्याजवळ काही मुलांना जमाव मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी ते आपल्या दुचाकीवरून तेथे गेले याप्रसंगी बिलाल कुरेशी, अशफाक कुरेशी व कादीर कुरेशी यांच्यासह सुमारे ४० जणांच्या जमावाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. जमावाने जितेंद्र भारंबे यांच्यासह इतरांवर लाठ्या-काठ्या आणि तलवारीने हल्ला केला. तसेच त्यांना पिस्तुलने धमकावून पिस्तुलीच्या दस्त्याने त्यांना मारहाण झाली. दरम्यान या हल्ल्यात जितेंद्र भारंबे यांच्यासह गणेश देवकर, पंकज चौधरी, पवन महाजन व राहूल पाटील हे जखमी झाले असून तर जितेंद्र भारंबे हे गंभीर जखमी झाले होते.

जमावाच्या विरोधात याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ तसेच आर्म ऍक्ट ३/२५ व ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात प्रारंभी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २० जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.