कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बेदम मारहाण

तरुण भारत लाईव्ह। १६ जानेवारी २०२३।  पहूर बसस्थानकावर आपले कर्तव्य पार पाडणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करीत धमकावण्यात आले. संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. कारवाईदाखल पहूर पोलिसांकडून बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आल्याने बसस्थानक मोकळा श्वास घेत असल्याचे जाणवते. मात्र किरकोळ व्यावसायिकांवर संक्रात आली आहे. दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार आहेत.

पहूर येथून रात्रीच्या वेळी ट्रक-लक्झरी बसेस तसेच इतर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. 14 रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे व पोलीस चालक रवींद्र मोरे कर्तव्यावर होते. रस्त्यावर अडथळा ठरणार्‍या दुचाकीस्वारास गाडी बाजूला लाव, असे सांगितल्याचा राग आल्याने एवढ्या शुल्लक कारणाने आरोपी शेख फिरोज शेख सांडू व खाँजा तडवी रा.खाँजा नगर, पहूर पेठ या दोघांनी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे व रवींद्र मोरे यांना बेदम मारहाण करीत त्यांच्यावर हल्ला चढविला. यात सुरवाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली व हात फक्चर झाला. सहकारी चालक रवींद्र मोरे यांनाही मारहाण करीत धमकी देत आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. पोलीस चालक रवींद्र मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख फिरोज शेख सांडू व त्याचा साथीदार खाँजा तडवी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहूर पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. पहूर पोलिसांवरच हल्ला होत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी सर्व पोलीस कर्मचार्‍यांसह कारवाई दाखल रहदारीस व वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या व्यावसायिकांची दुकाने तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध व्यवसाय करणार्‍यांच्या टपर्‍या, दुकाने काढून बसस्थानक परिसर मोकळा केला. बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आल्याने बसस्थानक मोकळा श्वास घेत असल्याचे चित्र आहे. मात्र हातावर पोट असलेल्या किरकोळ व्यवसायधारकांची दुकाने काढल्याने त्यांच्या कुटुंंबावर संक्रात आली आहे. त्यांचीही ग्रामपंचायतीने व पोलीस प्रशासनाने बैठक घेऊन वाहतुकीस अडथळा ठरणार नाही आशी जागा निश्चित करावी. ही समस्या सोडवावी, अशी मागणी किरकोळ व्यावसायिकांकडून होत आहे. बसस्थानकावर सातत्याने वाहतुकीस व रहदारीस अडथळा ठरणार्‍या मुजोर व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात यावा. जेणेकरून मुजोरी करणारे व पोलीसांवर हल्ला करणार्‍यांची गय केली जाणार नाही, याची दखल पोलीस प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.