---Advertisement---
Nandunbar News : धडगाव तालुक्यातून धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. धनाजे खुर्द येथील प्रतीक्षा पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपाच्या डिस्पेन्सर युनिटला (मशीनला) माथेफिरूने दारूच्या नशेत पेटविण्याचा प्रयत्न केला, तसेच फावड्याने तोडफोड करून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आणला. हा संपूर्ण थरार ३ ऑक्टोबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. या प्रकारात पंपावरील कर्मचारी थोडक्यात बचावले.
धनाजे खुर्द येथील प्रतीक्षा पेट्रोल पंपाचे संचालक सुभाष शंकर पावरा (वय ४२) यांनी या प्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संशयित विनेश ऊर्फ विना दानक्या पावरा (रा. धनाजे) हा काहीएक कारण नसताना दारूच्या नशेत पंपावर आला. त्याने प्रथम पेट्रोल पंपाला पेटविण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली. कर्मचाऱ्यांनी लगेच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच संशयिताने हातातील फावडा घेऊन थेट पेट्रोल भरण्याच्या डिस्पेन्सर युनिटवर आणि कपाटावर हल्ला केला. त्याने फावड्याच्या सहाय्याने हे युनिट आणि कपाट फोडून नुकसान केले, तसेच शिवीगाळ केली.
पेट्रोल पंपावर अशा प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न आणि शस्त्राने तोडफोड केल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून संशयितापासून दूर होत आपला जीव वाचवला. संशयिताच्या या धक्कादायक कृत्याचे संपूर्ण चित्रीकरण पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात संशयित विनेश ऊर्फ विना दानक्या पावरा याच्याविरुद्ध अंमलदार पोलिस नाईक सुनील चौधरी यांनी गुन्हा दाखल केला. हवालदार हरीलाल कोकणी तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संशयित विनेश पावरा याच्यावर यापूर्वीही २०१९ मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊनही संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.