---Advertisement---
कर चुकवून विदेशी मद्य भरून गुजरातमध्ये घेऊन जाणारे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदाराच्या अंगावर थेट वाहन चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोघे अधिकारी जखमी झाले आहेत. दोन संशयितांकडून सुमारे नऊ लाख ३६ हजार रुपये २३० रुपये किमतीचे विदेशी मद्य व वाहन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ विसरवाडी गावालगत सरपणी नदीच्या पुलावर पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले व सहाय्यक फौजदार मनोहर बोरसे हे नाकाबंदी लावून वाहन तपासणी करीत असताना वाहनचालक हेमंतकुमार धनसुखभाई राठोड (वय ३३, रा. १७०, गुंललाव प्रायमरी शाळेजवळ, ता. वलसाड, जि. वलसाड, गुजरात) व जैनिल रमेश पटले (वय २३, रा. मोठीवाकड, सुराफळिया, दमण) यांनी संगनमत करून कारमध्ये दमण व उत्तर प्रदेश राज्यातील सुमारे नऊ लाख ३६ हजार २३० रुपये किमतीचे विदेशी मद्य कर चुकवून दहिवेलकडून गुजरातमध्ये घेऊन जात होते.
त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन थेट उपनिरीक्षक देविदास वडघुले यांच्या अंगावर नेली. तसेच शासकीय वाहनाच्या (एमएच ३९, एबी ९६३२) उजव्या बाजुस बोनट व टायरला दोन ते तीन वेळा धडक मारून वाहनाचे नुकसान करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित वाहन जागेवर यूटर्न, रिव्हर्स मारून परत दहिवेलकडे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना ते पोलिसांच्या हाती लागले. या उपनिरीक्षक वडघुले व सहाय्यक फौजदार बोरसे जखमी झाले. याबाबत पोलीस शिपाई लिनेश पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक देविदास वडघुले तपास करीत आहेत.