धुळे येथील गुन्हे शाखेने गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना नगावबारी परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई रविवार, १६ रोजी दुपारी करण्यात आली. प्रणव किशोर शिंदे (२०, विंचूर, ता.धुळे) व विनय देवानंद नेरकर (२३, फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी, देवपूर, धुळे) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
धुळे येथील गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना दोन संशयित पिस्टलच्या धाकावर नगावबारी परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर नगावबारी परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. संशयित प्रणवच्या ताब्यातून ४० हजार रुपये किमतीचे पिस्टल तर एक हजार रुपये किमतीचे काडतूस विनय नेरकरच्या खिशातून जप्त करण्यात आले. प्रणवविरोधात पिंप्री चिंचवड येथे तर विनय विरोधात पश्चिम देवपूर व देवपूर पोलिसात एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, अमरजित मोरे, संजय पाटील, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली