---Advertisement---

जुन्या भांडणाची कुरापत काढून ठार मारण्याचा प्रयत्न, अखेर न्यायालयाने ठोठावली कठोर शिक्षा

---Advertisement---

नंदुरबार : मागील भांडणाची कुरापत काढून शेतकऱ्यावर कोयत्याने वार करत, जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सहा वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये इतक्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील मंगलसिंग ठाणसिंग गिरासे (वय ५०) हे दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांच्या शेतात जनावरांना चरण्यासाठी लोखंडी खुटी ठोकत होते. त्यावेळी प्रकाश रोहिदास कोळी यास तेथे हातात लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना पाहिले. मंगलसिंग गिरासे आणि प्रकाश कोळी यांच्यात ४ वर्षापूर्वीचे जुने वाद असल्याने, प्रकाशने मंगलसिंग गिरासे यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी घटनास्थळावरील लोक धावून गेले आणि त्यांनी प्रकाशच्या तावडीतून मंगलसिंग यांना सोडविले. आरोपी प्रकाश रोहिदास कोळी याने पळ काढला. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार यांनी या गुन्ह्याचा तपासात आरोपी प्रकाश रोहिदास कोळी यास अटक करून गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते, तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायालय, नंदुरबार यांच्यासमोर सादर केले होते.

खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. बी.यू.पाटील यांनी पाहिले असून, पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार नितीन साबळे, पंकज बिरारे, राजेंद्र गावीत यांनी कामकाज पाहिले आहे.

न्यायालयाने ठोठावला दंड


या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या समक्ष झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यावरून सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी प्रकाश रोहिदास कोळीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी भा.दं. वि.क.३०७ अन्वये दोषी ठरवत, ६ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---