---Advertisement---
शहादा : प्रेमविवाहात झालेल्या वादातून सूड घेण्यासाठी तरुणाला भरधाव कारने धडक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शहादा तालुक्यातील रायखेड येथे घडली. म्हसावद पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरला सकाळी दहाच्या सुमारास ही घटना रायखेड-खेतियादरम्यान कोचराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. यातील फिर्यादी शोएब इदरीस तेली (वय २७, रा. रायखेड) हे रस्त्यावर मजुरांची वाट पाहत उभे असताना, संशयित अतिक युनूस पठाण (वय २६, रा. रायखेड) याने कारने भरधाव येऊन शोएब इदरीस तेली याला मागून जोरदार धडक दिली.
शोएब तेली याच्या काकांनी संशयित अतिक पठाणच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. याच कारणावरून अतिक पठाणने राग मनात धरून सूड घेण्यासाठी हे कृत्य केले.
कारची धडक इतकी जोरदार होती की, शोएब तेली याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली, तसेच त्याच्या दोन्ही हातांना आणि चेहऱ्यावरही मार लागला. संशयित अतिक पठाणने शोएब तेलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि ‘जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला. या प्रकरणी ७ ऑक्टोबरला म्हसावद पोलिस ठाण्यात संशयित अतिक पठाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कामे तपास करीत आहेत.