जळगाव : शहरात एका बेजबाबदार व्यक्तीने अमानुषपणे कुत्र्याला मारण्याचा क्रूर प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून, या प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने कुत्र्याला कारच्या मागे दोरीने बांधून फरफटत नेत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राणीमित्र संघटनेचे पदाधिकारी ॲड. केदार भुसारी हे शहरातून जात असताना खंडेराव नगर परिसरात हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ
त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन कारमधील व्यक्तीने जखमी अवस्थेत टाकून दिलेल्या कुत्र्याला उचलले आणि आपल्या ‘संरक्षणम’ संस्थेच्या माध्यमातून पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू केले.
प्राणीमित्र संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, प्राण्यांवरील छळ करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
कुत्र्याचा जीव घेण्यासाठी कारला बांधून फरफटत नेलं pic.twitter.com/fe7XoXfieF
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) February 9, 2025
ॲड. केदार भुसारी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्राण्यांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.