संजय सराफ, प्रतिनिधी
फैजपूर : रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे एका समुदायाने संदल मिरवणुकीत औरंगजेब, टीपू सुलतान व 15 मिनिट शब्द लिहिलेला ओवेसी बंधू यांचे फलक झळकावल्याचा धक्कादायक प्रकार 16 जानेवारी रोजी घडला होता.
या प्रकरणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने सावदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात औरंगजेबचे बॅनर/फलक लावण्यावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वयसमिती यावल-रावेर विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
आयोजकांवर गुन्हा दाखल करावा
महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण सार्वजनिकपणे करणे, त्याचे फलक झळकवणे आदी कृत्यांवर राज्यात/जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी, हिंदूं कार्यकर्त्यांनी अफझलखान वधाचा फलक लावल्यावर स्वतःहून कारवाई करणारे पोलीस अशा वेळी मात्र तक्रार करणार्याची वाट पाहून वेळ घालवतात असा आरोपही यावेळी समितीकडून करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीच संदर्भात दिलेल्या आदेशात चिथावणीखोर, आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याबद्दल, लिखाण अथवा हावभाव केल्याबद्दल पोलिसांनी स्वतः हून गुन्हा नोंद करावा, असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे संदलमध्ये आक्षेपार्ह, चिथावणीखोर आणि धार्मिक भावना दुखावणारे फलक पकडल्याबद्दल संबंधितांवर व संदलचे आयोजक यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी देखील हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने निलेश चौधरी, अमोल निंबाळे, धीरज भोळे, यशवंत चौधरी, स्वप्नील पवार, ऋषिकेश मराठे, निखील माळी, अतुल महाजन, निलेश कोल्हे, कुणाल कोल्हे तसेच सावदा, वाघोदा येथील धर्मप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. फैजपूर येथील प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्यावतीने नायब तहसीलदार जगदीश गुरव यांनी निवेदन स्वीकारले.
सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात निखील सुनील महाजन यांच्या फिर्यादीवरून आवेश सलीम पिंजारी व चार ते पाच अनोळखींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लवकरच संबंधिताविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.