अडावद, ता. चोपडा : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील शेतशिवारात अज्ञात कारणाने मृत्यू पावलेल्या ‘त्या’ तीन बालकांच्या मृत्यूचे कारण अद्यापही न समजल्याने आज दि. २२ रोजी नायब तहसिलदार यांच्या समक्ष परस्पर पुरलेल्या दोन बालकांचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले
याबाबत माहिती अशी की, दि.१८ रोजी रात्री सिताराम बारेला यांची मुले अंजली बारेला, रोहित बारेला यांचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्यांचा परस्पर दफनविधी करण्यात आला होता. त्यांच्या मृत्यू बाबत त्यांच्या वडिलांनी व नातेवाईकांनी कोणालाही न कळवता मयतांचे प्रेत दफन केले होते परंतु त्यांचा मृत्यू नेमके कोणत्या कारणाने झाला आहे हे निष्पन्न करण्यासाठी शवविच्छेदन करणे गरजेचे असल्यामुळे मयताचे वडील सिताराम बारेला यांच्या संमतीने आज रोजी नायब तहसीलदार चोपडा रवींद्र रघुनाथ महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर,
डॉ. नितीन अहिरे व पंच यांच्यासमोर घटना स्थळी जाऊन त्या दोन बालकाने पुरलेले शव हे बाहेर काढण्यात आले व नायब तहसीलदार यांच्या समक्ष घटनास्थळी जागेवरचा पंचनामा करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत शवविच्छेदन करुन दोन्ही बालकांचे शव परत विधीप्रमाणे दफन करण्यात आले. या वेळी अडावद पो स्टे चे सपोनि संतोष चव्हाण, पोउनि राजु थोरत, पोहेकॉ जयदीप राजपूत, भूषण चव्हाण , ज्ञानेश्वर सपकाळे व अंगणवाडी सेविका सरला बाई साळूंखे हे उपस्थित होते. या घटनेची अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.