अयोध्येत प्रभू श्रीराम युवराज स्वरूपात विराजमान होणार!

अयोध्या,
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर तयार होत आहे. यात भगवान राम यांच्या जन्मस्थळावर बांधले जात असलेल्या मंदिरात राम यांची बाळस्वरूपात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, म्हणजे, पाच वर्षांच्या मुलाच्या आकारात देवाची पूजा केली जाईल. मात्र, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, प्रभू राम युवराजाच्या रूपात रामनगरीत विराजमान होतील.

प्रभू श्रीरामाची अचल मूर्ती बनवली जात आहे. धनुर्धारी असलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या स्वरूपात ही मूर्ती बनवली जात आहे. मात्र, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी श्रीरामाच्या मूर्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. 15 ते 24 जानेवारी या काळात प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होतील. भगवान रामाची जी मूर्ती याठिकाणी विराजमान होईल, याबाबतही त्यांनी भाष्य केले.

‘सकल सुमंगलतब होई जब राम होहि युवराज’ हा श्लोक म्हणत ते म्हणाले की, प्रभू श्रीराम यांच्यासाठी कोणत्याही शुभ मूहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. श्रीराम हे रामनगरी अयोध्येत युवराज स्वरूपात विराजमान होतील. यासाठी तयारी सुरू आहे. सध्या अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांना विराजमान करण्याची तयारी वेगाने सुरू आहे. दुसरीकडे राम मंदिराच्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये प्रभू श्रीरामाच्या वेगवेगळ्या मूर्ती देशातील प्रसिद्ध मूर्तीकार तयार करीत आहेत. यात राजस्थान आणि कर्नाटक येथील दगडांचा समावेश आहे.