Ayodhya Ram Temple : प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत घातपाताचा कट उधळला

खलिस्तान्यांनी अयोध्येत घातपात घडवण्याचा कट उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने उधळला आहे. उत्तरप्रदेश एटीएसने अटक केलेल्या तिघांचाही संबंध खलिस्तानी दहशतवादी संघटनेसोबत आहे. शंकरलाल, अजिकुमार आणि प्रदीप पूनिया अशी त्यांची नावे असून, त्यांनी श्रीरामाचा झेंडा लावून अयोध्येची रेकी केली होती. एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान शंकरलालने ही कबुली दिली. शंकरलाल कॅनडातील खलिस्तानी अतिरेकी हरमिंदर उर्फ  लांडाच्या संपर्कात होता. अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूने अयोध्येची रेकी करण्याचा आदेश दिल्याचे लांडाने शंकरलालला सांगितले होते.

शंकरलाल, अजितकुमार, प्रदीप पूनिया श्रीरामाचा झेंडा लावून अयोध्येत रेकी करीत होते. अयोध्येचा नकाशा पाठविण्यासही लांडाने या तिघांना सांगितले होते. लांडाच्या आदेशावरूनच हे तिघे अयोध्येत दाखल झाले होते.शंकरलाल हा राजस्थानातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर कित्येक गुन्हे दाखल आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या गँगस्टर्सच्या संपर्कात तो होता. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी हे तिघेही स्कॉर्पियोवर श्रीरामाचा झेंडा लावून अयोध्येत रेकी करीत होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर या तिनही आरोपींचे शिख्स फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूने एक ध्वनिफीत जारी करीत समर्थन केले. उत्तरप्रदेश एटीएसने या प्रकरणातील एसएफजेच्या भूमिकेचा तपास सुरू केला आहे.

२२ जानेवारीला होती मोठ्या हल्ल्याची योजना
तिघेही लांडाच्या संपर्कात होते. अयोध्येची रेकी करून नकाशा पाठवण्यास त्याने सांगितले होते. रेकीनंतर अयोध्येतच थांबून पुढील आदेशाची प्रतीक्षा करण्यासही त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घातपात घडवायचा होता. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक स्कॉर्पियो जप्त केली.