जळगाव : चांगलं काम करत असताना स्वतःला रोज सिद्ध करावं लागतं, मात्र या दबावाचा तुम्ही सकारात्मक विचार केला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या क्षमता वाढवू शकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्वल आहे. दृढनिश्चय केला तर या जगात अशक्य असं काही नाही. दीपस्तंभ मनोबल चे कार्य व उभारणी बघून मी आश्चर्यचकित झालो आहे. दिव्यांग अनाथ विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं काम कसं असावं याचा आदर्श या संस्थेने निर्माण केला आहे. महिन्यातून एकदा मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्की येईल, असे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले.
दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे पवार, डॉ.राहुल महाजन, डॉ.सोनाली महाजन, मानव संसाधन विकास सल्लागार सुहास कुलकर्णी उपस्थित होते. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थिनी माऊली अडकूर हिने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना राखी बांधली. प्रास्ताविक यजुर्वेंद्र महाजन यांनी तर सूत्रसंचालन स्नेहल शिंदे हिने केले.
आयुष्यात अनेक अडचणी आहेत पण त्या पार करणे गरजेचे आहे. अडचणीचा प्रभाव योग्यतेवर पडता कामा नये. आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडा. मनोबलचे दिव्यांगस्नेही बांधकाम हे एक आदर्श उदाहरण आहे, अश भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली.जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.नोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना कायमच सेवा देणाऱ्या डॉ.राहुल व डॉ.सोनल महाजन या दांपत्याचा तसेच मानव संसाधन विकास सल्लागार सुहास कुलकर्णी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रकल्पातील विद्यार्थिनींनी प्रमुख अतिथी, संचालक आणि विद्यार्थ्यांना राखी बांधली. यावेळी संस्थेचे सचिव लक्ष्मण सपकाळे व संचालक परेश शहा, यजूर्वेंद्र महाजन उपस्थित होते.