Ayush Prasad: विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करावे

जळगाव : महापालिकेने शहरवासीयांच्या आरोग्य व स्वच्छता या दोन महत्त्वपूर्ण बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून योग्य नियोजनासह प्रत्यक्ष काम करावे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुपारी चारला तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेत तालुक्यातील प्रश्नांची माहिती जाणून घेतली.

तसेच शहराला दिला जाणारा पंधरा दिवसांचा पाणीपुरवठा हा कमी दिवसांवर आणायचा असेल तर मुख्य जलवाहिन्यांवर असलेले नळ कनेक्शन तत्काळ बंद करावे, अशा सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.पालिका सभागृहात पालिकेच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, शहरातील आवास योजनेचे काम दहा डिसेंबरपर्यंत पूर्ण करून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.तसेच दिवाळी सणात शहरातील नागरिकांकडे पैसा उपलब्ध असतो,

यासाठी जास्तीत जास्त घरपट्टी, नळपट्टी वसुलीसाठी पालिकेने लक्ष घालून ३१ ऑक्टोबरपर्यंत शहरातील शंभर टक्के वसुली करावी. स्वच्छतेबाबत शहरात जागोजागी योग्य ते नियोजन करून लोकसहभागातून स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करावी. ओला कचरा व सुका कचरा याबाबत योग्य ते नियोजन करून घंटागाडी व कचरा संकलन करण्यासाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवावी. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाची योग्य अंमलबजावणी करावी. राजीव गांधी गतिमानता पुरस्कारासाठी पाठपुरावा करून योग्य ते नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केली आहे. दोन ऑक्टोबरला शहरातील ५० ते ६० महिलांनी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचित केले.

माजी नगरसेवक पी. जी. पाटील यांनी आताच्या स्थितीत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार केली.शहरात या योजनेमुळे जागोजागी खड्डे पडले असून, बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार असल्यामुळे हे काम कासवगतीने सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक पी. जी. पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कामासंदर्भात योग्य ते ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना दिल्यात.