जळगाव : रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकवर आत्महत्या सारख्या घटना नियमित घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केल्या. रेल्वे परिसरात होणाऱ्या आत्महत्येवर करावयाच्या उपाययोजनासाठी भुसावळ रेल्वे प्रबंधक व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली.
त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार सुरेश भोळे, मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, विभागीय परिचालन प्रबंधक योगेश पाटील, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंग करतांना तसेच रेल्वेच्या क्षेत्रात आत्महत्येच्या घटना नियमित घडत असतात. या घटनांवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. रेल्वे व्यवस्थापक श्रीमती पाण्डेय म्हणाल्या, रेल्वे प्रशासनाने आत्महत्या प्रवण क्षेत्रांचा शोध घेतला आहे. याविषयावर रेल्वे व जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे.