---Advertisement---
नवी दिल्ली : आयटी दिग्गज कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रेमजी इन्व्हेस्ट नैनिताल बँकेतील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. बँक ऑफ बडोदाची सब्सिडायरी असलेल्या नैनीताल बँकेचे डोंगराळ भागात मजबूत बँकिंग नेटवर्क आहे. प्रेमजी इन्व्हेस्ट ही अझीम प्रेमजी यांची फॅमिली इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. प्रस्तावित गुंतवणुकीमुळे उत्तराखंडमध्ये मुख्यालय असलेल्या बँकेचे मूल्य सुमारे ८०० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. प्रेमजी इन्व्हेस्टने टर्मशीटवर स्वाक्षरी केली आहे. चर्चाचे अनेक टप्पे पूर्ण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, अधिग्रहणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. पहिल्या टप्प्यात ५१ टक्के शेअर्सची विक्री केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित विकली जाईल, असे सूत्रांनी म्हटले. प्रेमजी इन्व्हेस्ट ही भारतीय स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत सक्रिय गुंतवणूकदारांपैकी एक आहे. त्याच्या व्यवस्थापनांतर्गत १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे. इन्शुरन्स मार्केटप्लेस पॉलिसीबाजार, आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट, क्रेडिट स्टार्टअप क्रेडिटबी आदींमध्ये कंपनीचा मोठा हिस्सा आहे. प्रेमजी इन्व्हेस्टकडे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी टीव्हीएस क्रेडिट, अग्रगण्य विमा कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ व पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी एफएसएसमध्ये शेअर्स आहेत. परंतु, बँकेतील त्यांची ही पहिलीच गुंतवणूक असेल.