Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दीकींनी त्या दिवशी ‘या’ नेत्याशी केलं WhatsApp चॅट, डायरीतही नाव लिहलं, अन् पुढच्या काही क्षणांत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गतवर्षी 12 ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी  वांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही एक मोठी राजकीय हत्या असल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. एकूण 26 आरोपी या प्रकरणात आहेत.  लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

पोलिसांनी दाखल  केलेल्या या आरोपपत्रात आपण पोलिसांना दिलेल्या माहितीचा कोणताही उल्लेख नाही, त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही, असा दावा बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  झिशान सिद्दीकी यांनी हे वक्तव्य करताना बाबा सिद्गिकी यांच्याकडील एका डायरीचा उल्लेख केला आहे. या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे असल्याचे सांगितले जाते.  हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स अॅपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं.

हेही वाचा: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सगल दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव

झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेला जबाब

वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यामुळे बाबा सिद्गीकी यांचा बड्या बिल्डर लॉबीशी वाद झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स यांचा उल्लेख आहे.

झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतल्याचाही उल्लेख आहे. त्या बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते, पण त्यानंतर ते तसं कऱणार नसल्याचं लक्षात आल्याचे झिशान यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या सगळ्या बिल्डर्सचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.